हिंदू नरकात नक्कीच जाणार नाहीत

This is the Marathi translation of my recent post “Of course Hindus won’t be thrown into hell” by Manohar Railkar

काही दिवसांपूर्वी एका बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं: कॅथॉलिक चर्चकडून दलित ख्रिश्चनांमध्ये भेदाभेद केला जातो, याकरता भारतामधील दलित ख्रिस्त्यांनी व्हॅटिकनविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघाकडे एक परिवेदिका (तक्रार) दाखल केली आहे. सदर परिवेदिका राष्ट्रसंघाच्या दिल्लीस्थित माहितीकेंद्रात दाखल झाली आहे.

पूर्वी एका लेखात मीच केलेल्या एका सूचनेचं मला स्मरण झालं. ती सूचना अनुचित तर नव्हतीच. उलट, खरं तर लक्षात घेण्याइतकी महत्त्वाचीच होती. हिंदू आणि बौद्धसुद्धा अशीच परिवेदिका ख्रिश्चन आणि मुस्लीमांविरुद्ध राष्ट्रसंघात दाखल करू शकतात. कारण ख्रिस्तीतर लोकांना ख्रिश्चन लोक धर्मलंड मानतात आणि सर्वशक्तिमान ईश्वराच्या कृपेला अपात्रही समजतात. तद्वतच मुस्लीमही मुस्लीमेतरांना धर्मबाह्य मानतात. परिणामी ते अमर्याद काळ नरकाग्नीत फेकले जाऊन त्यांना सातत्यानं पराकोटीच्या वेदना सहन कराव्या लागतील, असं त्या दोन्ही संप्रदायांचं मत आहे. मूर्तिपूजक हिंदू, त्यांच्या दृष्टीनं ह्या सदरात पडतात आणि त्या दोन्ही संप्रदायांच्या दृष्टीनं ते तर सर्वांत निंद्य लोक होत.

बायबलात मॅथ्यू (१३-४९,५०) म्हणतो: “युगान्त असा होईल, देवदूत येतील आणि सज्जनांपासून दुर्जनांना बाजूला काढलं जाईल. आणि मग त्या दुर्जनांना धगधगत्या भट्टीत फेककलं जाईल. तिथे ते आक्रोश करीत आणि कडकडा दातओठ खात बसतील.”

कुराणात धर्मबाह्य लोकांच्या केल्या जाणाऱ्या छळणुकीचं वर्णन अधिक विस्तारानं दिलं आहे: “पण, धर्मबाह्य लोकांकरता अग्नीची वस्त्रं अशी बेतली जातील, त्यांच्या मस्तकांवर उकळता द्रव ओतला जाईल. त्यामुळं त्यांच्या पोटात किंवा त्वचेत जे काही असेल ते वितळून जाईल. त्यांना टांगण्याकरता लोखंडी आकडे असतील. त्यांना मानसिक पीडा सहन करावी लागेल. तेथून पुन्हा त्यांना मागं आणून, आता अग्नीची चव कशी असते ते पाहा, असं सांगितलं जाईल.” (कुराण २२-१९ ते २२)

हिंदूंच्या मनात इतर पंथांतील माणसांविषयी अशा दुष्ट भावना कधीच नसतात, आणि इतरांनीही आपल्याबद्दल दुष्टावा बाळगू नये, असं त्यांना वाटत असतं. उलट, संबंधित ग्रंथांत काय आहे, ते माहीत नसतानासुद्धा ख्रिश्चनता आणि बायबलाबद्दल, किंवा कुराण आणि इस्लामबद्दल ते सदैव आदरभावच राखतात. मात्र, जो आदरभाव इतरांबद्दल आपण दाखवतो, त्याला तसा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत नाही, हेसुद्धा त्यांच्या ध्यानात येत नाही.

त्या ग्रंथात काय आहे, ते ठाऊक असणारेही काही लोक आहेत. पण ती वचनं फारशी प्रत्यक्षात येण्यासारखी असतील असं त्यांना वाटत नाही. त्यामुळं ते तिकडे दुर्लक्ष करतात. एक तर, ती वचनं तितकीशी गांभीर्याने घेण्याइतकी नाहीतच, असं त्यांना वाटत असावं. किंवा आणखी कुणी ती गांभीर्यानं घेत असेल याची त्यांना कल्पनाच नसावी. असल्या सांगण्यावर विश्वास बसेल अशा प्रकारे त्या लोकांच्या मनावर ठसवलं जात असतं, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. विशेषतः बालपणातच अशा बाबी ठसवल्या जात असतात. इसिसच्या लोकांचा विश्वास असतो आणि त्यानुसार वागायलाही ते सिद्ध होतात, असं नाही. कारण जे सांगितलं जातं त्यावर बालकांचा चटकन गाढ विश्वास बसतो आणि परिणामी प्रौढवयातही ते उलट प्रश्नही विचारीत नाहीत, हा माझा स्वानुभव आहे.

दुसरं म्हणजे पुस्तकांतील त्या विसंगत आणि भेदाभेद करणाऱ्या उताऱ्यांकडे आपलं लक्ष कुणी वेधावं, हेच त्याना नको असतं. कारण जगातील बहुसंख्यांना ती वाक्यं पवित्र वाटत असतात. श्रद्धावानांनी अश्रद्धांशी किंवा खरं तर, हिंदूंसारख्या चुकीच्या श्रद्धा बाळगणाऱ्यांशी लढायला हवं याची ती वाक्यं आपल्याला स्मरण देतात, हेच त्यांना अप्रिय असेल. पण, सर्वशक्तिमान परमेश्वरावर तर हिंदूंची श्रद्धा असल्यामुळं त्यांना अश्रद्ध तर नक्कीच म्हणता येत नाही.

पण ही प्रवृत्ती आजच्या युगात सफल होण्यासारखी नाही. कारण कुराण काय, किंवा बायबल काय, आज महाजालावर सहजपणं उपलब्ध होतात.  बायबलातील किंवा कुराणातील वचनंही वाटेल त्याला सहजी मिळू शकतात. त्यामुळं महाजालाच्या मार्गे मुस्लीमांत बुद्धिवाद रुजू शकतो. पण, जर्मनीतल्या एका लेखनिकाने बुद्धिवादी मुस्लीम तरुणांवर बंदी घातली आणि ज्यांनी कुणी इसिस इस्लामच्या विरोधी असल्याचं प्रतिपादन केलं, त्याचा मानसिक गोंधळ असल्याचं एका जर्मन तुर्की माणसानं म्हटलं. कारण इसिस कुराणाचंच पालन करीत आहे हे त्याला माहीत होतं.  त्याला कसं कळलं? तो म्हणाला, मी आणि माझ्या एका मित्रानं कुराण वाचलं आहे. मी आणि माझे मित्र इसिसकरताच लढत आहोत.

राष्ट्रसंघाकडे  जाण्याची जी सूचना वर मी केली ती राष्ट्रसंघ काही करील ह्या कल्पनेनं नव्हे. तर त्या परिवेदिकेमुळं त्या प्रश्नाला तोंड फुटून तो ऐरणीवर येईल आणि त्यावर व्यापक चर्चा होऊ लागतील, ह्या कल्पनेनं केली. अश्रद्धांना सातत्यानं नरकात जळावं लागेल ही कल्पना किती विसंगत आणि विपर्यस्त आहे, हे ख्रिस्ती आणि मुस्लीम धरून सर्वांच्या ध्यानात येण्याची आवश्यकता आहे.

परिस्थितीचं गांभीर्य सर्वांना जाणवलं पाहिजे. हिंदू आणि इतर काही लोक सर्वशक्तिमान ईश्वराच्या दृष्टीनं आपल्या समान पातळीचे नाहीत, असं जगातल्या अर्ध्याअधिक मुलांना शिकवलं जातं. आणि मुलांचा त्यावर विश्वास बसणं स्वाभाविक असतं. तो सर्वशक्तिमान परमेश्वर इतरांचा इतका तिरस्कार करतो आणि त्यांना तो नरकाग्नीत जळत ठेवणार आहे, असं त्या मुलांना शिकवतात. आणि त्यांनी आपल्या मार्गाचा अंगीकार केला नाही तर तो त्यांना अनंतकाळ तसंच जळत ठेवणार आहे. मग तो श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, कुणी ऋषी, स्वामी विवेकानंद, रामदेवबाबा, श्री श्री रविशकर, आनंदमयी माता, नरेंद्र मोदी, ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर, कुणीही असो. तुम्ही नाव सांगा, त्यांची हीच गत होणार. कुणाही हिंदूवर तो कसलीही दया दाखवणार नाही. त्या सगळ्यांना तो धगधगत्या भट्टीत फेकणारच.

खरं तर, अशा प्रकारची प्रच्छन्न धमकी देऊन स्वतःच्याच अनुयायांत एक दहशत पसरवण्याचा तो एक डावपेचाचा भाग होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यातून इतर संप्रदायांतील लोकांना आपल्या पंथात ओढून आणण्याचं आणि तेच एकमेव सत्य असल्याचं जे लोक ते मान्य न करून सर्वशक्तिमान ईश्वराचा अपमान करतील त्यांना नामशेष करणं हेच त्यांचं कर्तव्य कसं आहे, हे त्यांच्या मनावर ठसवणं हाच मुख्य उद्देश  अश्रद्धांकरता नरकाग्नी म्हणजे खरं तर, सत्ता आणि प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न होय. त्याचा आणि अंतिम सत्याचा किंवा नीतिमत्तेचा कसलाच संबंध नाही.

इतर सर्वांसाठी नरकाग्नीच असा दावा एखाद्या लहानशा वेगडळ संप्रदायानं केला असता तर त्या मूर्ख वल्गनांकडे कुणीही झालं तरी दुर्लक्षच केलं असतं. पण, हे म्हणणारा संप्रदाय किरकोळ नाही. हा दावा पृथ्वीवरील दोन प्रभावशाली संप्रदायांच्या तत्त्वाचाच भाग आहे. आणि त्यांच्या अनुयायांची संख्या आज चार अब्ज आहे. सुदैवानं युरोपातील कित्येक ख्रिस्ती लोक आता त्यावर मुळीच विश्वास ठेवीत नाहीत. पण तरीही तो ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचा अजूनही अविभाज्य हिस्सा आहेच.

आजच्या ह्या क्वांटम भौतिकीच्या युगात, जगातील सर्व चराचर वस्तू अंतिमतः परस्परांशी जोडलेल्या आहेत, हे प्रस्थापित झालेल्या काळात, असल्या कल्पना म्हणजे बाष्कळपणा म्हणता येईल ना?

यावर हिंदू मौन बाळगतात, जे अतर्क्य आहे. ते आपोआप विस्मरणात जाईल, असं त्यांना वाटतं. पण, ते सहजासहजी विसरलं जाणार नाही. सामर्थ्यानिशी ते चिरडून टाकल्याविना नाहीसं व्हायचं नाही. त्या दाव्याला कुणीच आक्षेप घेत नसेल आणि त्यामुळं कुणाला लाभही होत असेल तर कोण कशाला सोडील?

निषेधानंतर चर्चनं एके काळी पाय मागं घेतलाच होता. नास्तिकांना शिक्षा करण्याचा त्यांचा अधिकार संपला होता. आणि ख्रिस्त्यांना चर्चचा त्याग करू दिला गेला होता. आणि तेव्हापासून त्यांचा कळप घटायलाही लागला. तेव्हा पाश्चात्त्य लोक अंधारयुगातून बाहेरही पडले. पण, व्हायची ती हानी झालीच होती. उद्दामपणा आणि श्रेष्ठत्वाची भावना त्या लोकांच्या हाडीमांसीच भिनून गेले होते. परिणामी, निसर्गाचं पावित्र्य ओरबाडून काढण्यात आलं आणि गुलामासारखी त्याची पिळवणूक चालू राहिली.

अश्रद्धांना त्यांच्या त्यांच्या समाजातून उपटून हळू हळू पण निश्चयानं त्यांनाही उद्दाम, अहंकारी बनवून जगावर राज्य करण्याकरताच ईश्वरानं आपली निवड केली असल्याची भावना त्यांच्यांत रुजवण्यात आली. स्थानिक अश्रद्ध समाजापेक्षा आपण ख्रिस्ती उच्च असल्याच्या भावनेतून मग तिथं वसाहतींचं राज्य चालू झालं. सर्वजण अल्लाचंच पूजन करीत नाहीत तोवर अश्रद्धांची मुंडकी उडवण्याकरताच मुस्लीम आक्रमक असे राक्षशी बनले काय?

अल्लाने अश्रद्ध जनांचा त्याग केला आहे, ह्या दाव्यातूनच आज आढळणारी मुस्लीम दहशतवादाची समस्या फोफावली आहे. असल्या गलिच्छ लोकांचं पृथ्वीतून निर्दालन करणं हेच इसिस, बोको हरम, इत्यादींना आपलं परमपवित्र कर्तव्य वाटतं.

ख्रिस्त्यांनी अश्रद्धांच्या कत्तली थांबवल्या खऱ्या. पण आजही भारतासारख्या अस्पर्श क्षेत्रांची हानी ते  करीतच आहेत. त्यासाठी ते फसवणूक, धमक्या अशा मार्गांनी किंवा भुरळ घालून, मूळच्या आपल्या सहिष्णु समावेशक परंपरांपासून दूर करून त्यांनाही स्वतःप्रमाणं विसंगत आणि उद्दाम बनवू पाहात आहेत.

इस्लामचे काही अनुयायी तर आजही कत्तली करतातच आहेत. त्यांना आता मुस्लीम न म्हणता इस्लामी म्हणतात. मात्र जोवर अश्रद्धांच्या हत्या करण्याचा उपदेश करणारी कुराणातील वचनं आता केवळ ऐतिहासिक असल्याचं मानून ती अधिकृतपणं वगळली जात नाहीत, तोवर ते मुस्लीम नाहीत, हा त्यांचा दावा प्रांजल मानता येणार नाही. एकीकडे त्या तरुणांचा आपण अगदी कठोर शब्दांत धिक्कार करतो, तर त्याच तोंडानं दुसरीकडे असली वचनं पाळायला लावणारे ग्रंथ आदरणीय मानतो.

मी जर अमेरिकेचा अध्यक्ष झालो तर मुस्लीमांना अमेरिका बंद करीन, असं जेव्हा डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तेव्हा ते अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिकांच्या भावनाच बोलत असतात. पण त्यानं मूळ समस्येचा निरास होणार नाही. त्यापेक्षा चांगला उपाय म्हणजे कुराणातील काही उतारे नाकारायला मुसलमानांना भाग पाडावं. त्याच वेळी बायबलातील काही उतारे नाकारायला ख्रिस्त्यांनाही भाग पाडायला हवं. कुणाही व्यक्तीचं आयुष्य नष्ट करण्यापेक्षा, सर्वोच्च शक्तीनं सत्य काय ते केवळ जीझसला किंवा केवळ महमदांनाच सांगितलं असल्याच्या अंध विश्वासाविरुद्ध शंका उपस्थित करायला हव्यात.

“ख्रिश्चन आणि मुस्लीम बंधू होत,” असं विधान पोप यांनी आफ्रिकेत नुकतंच केलं. मला तर ते वाक्य “जगा आणि जगू द्या,” ह्या थाटाचं वाटलं.  कारण, भारतातील वास्तव्यात त्यांनी सहकार्याचं असं विधान केलं नव्हतं. उलट पक्षी, भारतात ते म्हणतात, “आशियात आम्ही क्रॉसची लागवड करू.” का? हिंदू मवाळ असल्यामुळं आपलाच विनाश करणाऱ्या योजनेला ते आक्षेप घेणार नाहीत, म्हणून का? की हिंदूंच्या विरुद्ध दंडेलीच करायचा त्यांचा बेत आहे?

ख्रिश्चनतेजवळ खरोखरीच निखळ सत्य असतं तर चाललं असतं. पण परिस्थिती तशी नाही. आपण  सर्वोच्च आहोत, ह्या त्यांच्या दाव्याला कसलाही आधार नाही. केवळ अंधविश्वास. तद्वतच मुस्लीमांचा सर्वोच्चतेचा दावासुद्धा निराधार आहे. तोही अंधविश्वासच. दोन्ही अंधविश्वास परस्परांनाच आव्हानात्मक बनू शकतात. मग त्यांच्यांतला काल्पनिक संवाद असा होईल, वाचा.

ख्रिस्ती: “केवळ आमच्याजवळच पूर्ण सत्य आहे.”

मुस्लीम: “केवळ आमच्याजवळच पूर्ण सत्य आहे.”

ख्रिस्ती: “ईश्वरानं संपूर्ण सत्य केवळ जीझस ह्या आपल्या पुत्रालाच सांगितलं आहे.”

मुस्लीम: “ईश्वरानं संपूर्ण सत्य केवळ महमद ह्या आपल्या प्रेषितालाच सांगितलं आहे.”

ख्रिस्ती: “सर्वांनी देवाची भक्ती त्याच्या मुलामार्फतच केली पाहिजे.”

मुस्लीम: “सर्वांनी अल्लाचीच भक्ती केली पाहिजे.”

मात्र, “नास्तिकांना आणि अश्रद्धांना पृथ्वीतलावरून नाहीसंच केलं पाहिजे,” ह्याबद्दल दोघांचं एकमत आहे.

हिंदुत्वाची पद्धत अगदी वेगळी आहे. शतकानुशतके त्यांनी अनुभवाधारित ज्ञान आणि अंतःप्रेरणा यांनाच प्राधान्य दिलं आहे. हिंदुत्वाला कोणत्याही श्रद्धांचं वावडं नाही। (सर्वोच्च न्यायालय) त्यानं प्रतिपादन केलेलं तत्त्वज्ञान खोल आहे. ज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर ते उतरू शकतं. प्राचीन ऋषींनी सांगितलेलं ते ज्ञान कधीही असत्य ठरलं नाही. ते निखळ सत्याचंच दर्शन घडवतात. पोथीनिष्ठ संप्रदायांना ते माहीतच नाही. सत्य केवळ विचांरांतून जन्मलेल्या विश्वासावर आधारलेलं नसतं तत्वमसि आणि सत्, चित, आनंद असतं.

मानवतेनं २१व्या शतकात तरी परनिंदेवर मात करायला हवी. तशी परिस्थिती नाही. इतकंच नव्हे तर ज्या देशांतील कायदे परनिंदेवर आधारलेले आहेत, त्यांचा त्याग करण्याबद्दल त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. उलट, विश्वास बसत नसला तरी ते सत्यच. अशी घटना म्हणजे सर्व जग परनिंदाधारित कायद्यांखाली आणण्याकरता मुस्लीम देशांची एक संघटना (Organization of Islamic Countries) प्रयत्नशील आहे. इस्लामची निंदा हा गर्हणीय अपराध मानावा अशी याचिका सौदी अरेबिया, पाकिस्तानसारख्या कित्येक राष्ट्रांनी राष्ट्रसंघाकडे सादर केली आहे. नवल म्हणजे अध्यक्ष ओबामा आणि हिलरी क्लिंटन ह्यांनी त्या ठरावाला पाठिंबाही दिला आहे. (Istanbul Process 16/18) त्यातून इस्लमानिंदेला (Islamophobia’) आळा बसेल अशी त्यांची अपेक्षा आहे.  इस्लामवर टीका करण्यावरसुद्धा बंधन आणण्याचे प्रयत्न चालूच आहेत.

ज्या देशांत हिंदु, बुद्ध किंवा निरीश्वरवाद्यांची बहुसंख्या आहे अशा भारत, चीन, जपान, ताईलंड इत्यादी देशांनी एकत्र येऊन त्यांच्या ह्या प्रयतनांना नुसता खोडा घालून पुरणार नाही. तर त्यांचे हे प्रयत्न  खच्ची करण्याकरता, तर्काला न पटणारे दावे त्यांनी थांबवावेत, अशी मागणी केली पाहिजे. हिंदूंच्या मूर्तिपूजेला तर ते तुच्छ लेखतातच. पण, बुद्ध, शीख, जैन आणि निरीश्वरवादीसुद्धा ख्रिस्त्यांच्या आणि मुस्लीमांच्या दृष्टीने विशेष आदरणीय समाज नसतात.

हिंदूंनी आता जागे होण्याची वेळ आली आहे. त्यांनी राष्ट्रसंघात केवळ याचिका  दाखल केली तरी ख्रिस्ती आणि मुस्लीम यांना, “आपले दावे तर्काला पटणारे नाहीत, त्यामुळे त्यांचा स्वीकार कुणीही करणार नाही, तद्वतच हिंदू म्हणजे पृथ्वीवरचा टाकाऊ कचरा नव्हत आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे,” हे, कदाचित, समजू लागेल.

इतरांबद्दल मनात द्वेषभावना उत्पन्न करण्याकरता बालकांवर बालपणापासूनच कुसंस्कार करण्याला अपराध मानलं जावं ह्याकरता युनिसेफनंही (बालकल्याणाकरता असलेला निधी) प्रयत्न करायला हवेत. एक बालक आपल्या टेडी अस्वलाचा गळा कापत असल्याचं दाखवणारा, इसिसनं प्रसृत केलेला एक व्हिडिओ तर पाहावत नव्हता. इतकं ते दृश्य बीभत्स आणि रौद्र होतं. याचिकांकरता आंदोलनही  चालू करायला हवं. हिंदु धर्माची  अकारण निंदा करणाऱ्या ख्रिश्चन आणि मुस्लीमांना असं नुसतं सोडून चालणार नाही. ह्यावर प्रकट चर्चाही घडवून आणायला हव्यात. कोणत्या धर्माजवळ खरं तत्त्वज्ञान आहे, त्याबद्दल जागतिक मत घडवायला हवं.

खरं म्हणजे, एका बाजूला सर्वांमध्ये बंधुभावना आणि दुसऱ्या बाजूला सर्वांनी एकाच श्रद्धेचं अनुयायी होईतो संघर्ष चालू ठेवण्याचा हट्ट, या दोहोंतूनच निवड करायला हवी, हे स्पष्ट आहे.

सर्वांमघ्ये बंधुभाव ह्या पर्यायाची निवड करू या. नव्हे त्यात मनुष्येतर प्राण्यांचाही अंतर्भाव करू या.

मारिया विर्त

अनुवाद: प्रा. मनोहर रा. राईलकर

(मूळ लेख खालील दुव्यावर पाहायला मिळेल.)

https://mariawirthblog.wordpress.com/2015/12/22/of-course-hindus-wont-be-thrown-into-hell/

2 comments

  1. search for word sanskrit here
    http://www.wakingtimes.com

  2. अभ्यासपूर्ण लेख !!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: